Content
सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपालबाबा महाराज, पिठापुर

सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपालबाबा महाराज, पिठापुर

सन १९८० साली आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम रेल्वेस्टेशनवर शेकडो वर्षांच्या अखंड समाधीतून उठून एक अवलीया अवतरले. डोक्यावरील जटा कमरेच्या खालपर्यंत हातांच्या नखांच्या भेंडोळ्या, पायांच्या बोटांची नखे वर्षानुवर्षांच्या समाधीतील बैठकीमुळे वरच्या दिशेस वळलेली, दिगंबर काया. प्लॅटफॉर्मवरुन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या नजरेत भरले की, ही आसामी वेगळीच आहे. ही आसामी म्हणजेच अवधूत अवलीया सद्गुरु भगवान श्री श्री श्री गोपालबाबा महाराज!

आसपासच्या सज्जन भक्तांनी श्रीगोपाल बाबांना चहा, सिगारेट, जेवण देण्यास भीतच सुरुवात केली. श्रीगोपालबाबा एका भक्तास म्हणाले की, "मुझे तेरे घरमें बारा साल रहने का है." तो भक्त श्रीगोपालबाबांना आपल्या घरी घेवून गेला व श्रीगोपालबाबा त्याच्या घरी १२ वर्षे राहिले. या फुलाच्या सुगंधाने अनेकभक्त श्रीगोपालबाबांना शोधत येवून दर्शन घेवू लागले. यानंतर बाबांचे वास्तव्य सन १९९३ ते २००० च्या मध्यापर्यंत विशाखापट्टणम् जिल्ह्यातील नरसीपट्टणम् जवळ बलीघटम् येथील पागलपाटी गुरुजी समाधी आश्रमात झाला. सुरुवातीस येथील विश्वस्त बाबांना आश्रमात येवू देण्यास तयार नव्हते. त्यावेळी बाबा येथील जंगलात ऊन, वारा, पाऊसात सहा महिने झाडाखाली बसून राहिले. त्यामुळे लोकांच्या विचारात बदल होवून त्यांनी बाबांना सन्मानपूर्वक आश्रमात घेतले. २००० साली बाबा येथून निघून २००३ सालापर्यंत राजमुद्रीजवळ धवलेश्वरम् येथे भक्ताच्या घरी वास्तव्यास होते. २००३ पासून बाबांचा प्रवास सुरु झाला. विशाखापटणम्, हैद्राबाद, बैंगलोर, राजमुद्री, माणिकनगर (हुमनाबाद), अक्कलकोट, गाणगापूर, सोलापूर, अहमदनगर, शिर्डी असा तो प्रवास होता. २००६ साली बाबांनी राजमुंद्री येथे वास्तव्यास असतांना जवळच्या भक्तांना पिठापूर येथे जावून अन्नदान सुरु करण्यास आदेशीत केले. व 'मेरा टाईम आने के बाद मै पिठापूर आता' असे बाबा बोलले. त्यानुसार भक्तांनी पिठापूर येथील पादगया क्षेत्रात कुकटेश्वर मंदिराच्या मागे मांडव टाकून नित्य अन्नदान केले. मे २००७ साली बाबा बेंगलोर येथे एका भक्ताच्या घरी वास्तव्यास असतांना बाबांनी पिठापूरात वस्त्रदान व विद्यादान सुरु करण्याचा आदेश दिला. त्यानुसार दि. १२-६-२००७ साली भक्तांनी पिठापूरात विनामूल्य शाळा सुरु करुन विद्यादान प्रारंभ केला व त्यावर्षीच्या दत्त जयंती पासून वस्त्रदान सुरु केले.

अन्नदान सुरु होताच, बाबांनी त्यांच्या भक्तास दृष्टांतात पिठापूर बायपास रोडवरील हायटेंशन विद्युत लाईन गेलेली एक शेतजमीन दाखविली व ही जमीन विकत घेण्याची आज्ञा केली. या दृष्टांतात बाबा ७० फुट उंच असून त्यांनी उजव्या हाताने हायटेंशन विद्युत केबल धरून ठेवलेली होती. हे दर्शवून बाबांनी स्वत:चे सामर्थ्य दाखविले. २००७ साली बाबांच्या आदेशाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका घेवून पायी पालखी सोहळा पिठापूर- माणिकनगर- गाणगापूर-अक्कलकोट-शिर्डी येथे आला.पालखी समारोपास बाबा स्वतः अचानक शिर्डीत प्रकटले.

२००८ साली बाबा नवरात्रीत एका भक्ताच्या घरी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अमलापूर येथे होते. बाबांच्या काही भक्त बाबांना पुन्हा विशाखापटणम येथे नेत असतांना पिठापूर बायपास रोडवरुन बाबांची गाडी जात होती.त्यावेळी २००७ साली भक्तास दुष्टातात दाखविलेल्या शेत जमीनीवर बाबांनी गाडी घ्यायला लावली. हीच आजची बाबांची आश्रमाची जागा. हा दिवस होता दि. ९-१०-२००८, विजयादशमी! श्रीगोपालबाबा गाडीतून खाली उतरले व बांधकामाच्या ठिकाणी खुर्ची टाकून बसले. श्रीगोपाल बाबांनी घोषणा केली की, "ये मेरा घर है, अब मुझे यहाँ रहनेका है, यह घर तीन दिनमें बनाओ, अब किराये के मकान में क्यों रहना ?" असे म्हणून श्रीगोपालबाबा पुन्हा गाडीत बसले व पुढे त्यांच्या मुक्कामी जाण्याचा इशारा केला. नंतर हे बांधकाम पूर्ण होई पर्यंत श्रीगोपालबाबा पिठापुरातच राहिल. बांधकाम पूर्ण होण्यासाठी चाळीस दिवसांचा कालावधी लागला. (चाळीस दिवस म्हणजे एक मंडल. या कालावधीचा अध्यात्मिक महिमा श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये सविस्तर दिलेला आहे.) कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी (श्रीपादांची माता सुमती महाराणी यांचा जन्मदिवस) २००८ साली श्रीगोपालबाबा कायम वास्तव्यसाठी आश्रमात अवतरले व बोलले की, ''सात साल मेरा शरीर यहाँ काम करेगा". असे बोलून कायम वास्तव्यास राहिले. या कालावधीत श्रीगोपालबाबांनी कधीही पिठापुर सोडले नाही किंवा कोणा भक्ताच्या घरी गेले नाही. आश्रमात वास्तव्यास येताच श्रीगोपालबाबांनी आज्ञा केली की, “अब धुनी चालु करो." धुनी प्रज्वलीत करण्यासाठी श्रीक्षेत्र शिर्डी येथील श्रीसाईबाबांच्या द्वारकामाईतील अखंड धुनीतील मुळ अग्नी आणायला सांगितला, त्यानुसार अग्नी आणताच श्रीगोपालबाबांनी स्वहस्ते त्यात १०८ नारळ अर्पण करुन ९ जानेवारी २००९ रोजी अखंड धुनी सुरु केली. ही धुनी श्रीगोपालबाबांच्या, दत्त भक्तांचे कर्म, प्रारब्ध, व्याधी निवारणाचे कार्य अखंड करते.

श्रीगोपालबाबांच्या आज्ञांनुसार सुरु असलेले तीन कार्यक्रम आश्रमात विस्तारीत करण्यात आले. यातील पहिला मुख्य कार्यक्रम म्हणजे श्रीक्षेत्र पिठापूर परिसरातील गोरगरीब, अनाथ, रुग्ण व गरजु यांना नित्य अन्नदान. यामध्ये दररोज दुपारी १२ ते ३ या वेळेत महाअन्नदान सुरु करण्यात आले. जही ही सेवा अखंड सुरु असुन यामध्ये दररोज ५०० ते ७०० लोकांना अन्नदानाचा लाभ होतो. श्रीगोपालबाबांची दुसरी आज्ञा म्हणजे विद्यादान, यामध्ये गावातील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आश्रमात मोफत विद्यालय सुरु करण्यात आले. यामध्ये आज २०० विद्यार्थी उच्च दर्जाचे शिक्षण घेत असून त्यांना गणवेश, शालेय साहित्य, वाहतूक व्यवस्था, सकाळी दुध, नाश्ता व दुपारचे जेवण इत्यादी आश्रमामार्फत मोफत पुरविण्यात येते. श्रीगोपालबाबांची तिसरी आज्ञा म्हणजे वस्त्रदान. त्यानुसार प्रत्येक दत्तजयंतीस व विविध ऋतुत पिठापुर परिसरातील व पंचक्रोशीतील गोर गरीबांना वस्त्रदान केले जाते. यामध्ये साड्या, लुंगी, शर्टस्, ब्लॅकेटस्, चपला वितरीत करण्यात येतात व वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांनामार्फत मोफत तपासणी करुन विविध आजारांवर निरनिराळे औषधे मोफत वितरीत केले जातात. श्रीगोपालबाबांच्या नावातच " गोपाल असल्याने आश्रमात सन २०१४ साली श्री गोपालबाबांच्या आज्ञेवरुन गो संरक्षणार्थ गोशाळा सुरु करण्यात आली. यात प्रसिध्द ओंगुल, म्हैसुर, गिर वगैरे भारतीय वर्णाच्या १०० गायींचे रक्षण व पालन करण्यात येत आहे.

आश्रमात नित्य सकाळी श्रीगोपालबाबांच्या कपिला गायीची पुजा करुन औदुंबर वृक्षाखाली श्रीपाद श्रीवल्लभांना पंचामृत अभिषेक केला जातो. नंतर श्रीगायत्री होम, श्रीपादांना व अखंड धुनीस नैवेद्य अर्पण करुन नित्य अन्नदानास सुरुवात होते. सायंकाळी आश्रमात श्रीपाद श्रीवल्लभांची पालखी निघते. आश्रमात दर पौर्णिमेस श्रीसत्यदत्तव्रत, श्रीगायत्री हवन वद्य पंचमीस संतान प्राप्तीसाठी ऋषिपुजन होते. तसेच दर शनिवारी सायंकाळी प्रदोषकाळी भक्तजन रक्षणार्थ सर्व ग्रह बाधा पिडा प्रशमनार्थ पार्थिव शिवलिंगास तैलाभ्यंगस्नान व तिलाभिषेक करण्यात येतो. आश्रमात श्रीगुरुपौर्णिमा, श्रीराखी पौर्णिमा, श्रीपाल श्रीवल्लभ स्वामी जयंती महोत्सव, श्री महालय अमावस्या, विजयादशमी, कार्तिक पौर्णिमा, महाशिवरात्री या महत्वांच्या पर्वास उत्सव साजरा करण्यात येतो व महाअन्नदान करण्यात येते.

श्रीपाद श्रीवल्लभ संपुर्ण चरितामृतामध्ये श्रीपादांनी वचन दिले आहे की, ते श्रीक्षेत्र पिठापुर येथे अवधूत रुपात कार्य करतील. आजच्या काळातील तेथील अवधुत म्हणजे श्रीगोपालबाबा महाराज. जे कायम दत्तात्रेयांप्रमाणेच “बालोन्मत्तपिशाच्चवृत्ती” अवस्थेत असत. श्रीगोपालबाबांनी आश्रमात वास्तव्यास सुरुवात केल्यानंतर देश विदेशातून श्रीदत्त भक्तांना दृष्टांतातून दर्शन व आदेश देत श्रीक्षेत्र पिठापूर येथे बोलावून घेतले व त्यांचे हातून जगतकार्यास सुरुवात करुन घेवून विविध जबाबदाऱ्या सोपवून या भक्तांचा सर्व योगक्षेम श्रीगोपालबाबांनी बहन केला. श्रीगोपालबाबा सतत त्यांच्या उन्मनी मौन अवस्थेतच असत. क्वचित प्रसंगी श्रीगोपालबाबा मराठी, इंग्रजी, तेलगु, उर्दु, राजस्थानी, जाट, पंजाबी वगैरे भाषेत येणाऱ्या भक्तांना त्यांच्या भाषेत सांकेतिक बोध देत असत. श्रीगोपालबाबांच्या शारिरीक वयाचा अंदाज कोणासही शेवटपर्यंत बांधता आला नाही. तथापी २५ डिसेंबर २०१० रोजी पौष शु. द्वितियेस श्रीगोपालबाबांनी सांगितले की, “आज मै २५२ सालका हो गया." पौष शु. द्वितिया ही श्रीदत्तात्रेयांचा द्वितीय अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जन्मतिथी होय.

सन १४५८ साली माघ वद्य प्रतिपदेस म्हणजेच श्रीगुरु प्रतिपदेस श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीशैल क्षेत्रात कर्दळी वनात गमन करते झाले. पुढे ३०० वर्षांनी श्री स्वामी समर्थ अवतारात पुन्हा प्रकट झाले. हा प्रकट दिन म्हणजे पौष शुध्द द्वितिया. श्रीगोपालबाबा म्हणाले त्यादिवशी श्रीस्वामी समर्थांना प्रकट होवून २५२ वर्षे झाली. श्रीगोपालबाबा म्हणत "एक होता है बागलकोट और एक होता है अक्कलकोट. मै अक्कलकोट हूँ." श्रीबाबा सर्वांतर्यामी असून दर्शनास येणाऱ्या तसेच सुदूरच्या गावातील आठवण काढणाऱ्या ज्ञात-अज्ञात भक्तांची, त्यांच्या कुटुंबियांची शिक्षणे, घरे, लग्ने, नोकरी, धंदा, संतती, संपत्ती अशा भौतिक तसेच अध्यात्मिक साधनेबाबत सर्वांगिण काळजी घेतात. श्रीगोपालबाबांसमोर नुसते बसले तरी त्यांना काही सांगावयाची गरज पडत नसे. येणाऱ्या दर्शनार्थीवर कोणते संकट आहे हे त्या दर्शनार्थीलाही माहित नसायचे व श्रीगोपालबाबा क्षणात त्या संकटाचे निरसन करुन त्याची प्रचिती त्या भक्तास देत. मग ते सर्व कुटुंबच दत्तभक्तीत लीन होत असे.

पूर्वी एकदा २००७ साली बाबा एका भक्ताच्या बेंगलोर येथील घरुन गाडीने विशाखापटणमूला येत असता रस्त्यात चित्रदुर्गजवळ चिकमंगळूर घाटात दत्तात्रयांचे बाबाबुढनगिरी नावाचे डोंगरावरील स्थानावर रात्री मुक्कामी राहिले. त्यारात्री बाबांजवळ जे दोन भक्त सेवेत होते त्यांना आकाशवाणी ऐकू आली की, तुम्ही ज्यांची सेवा करत आहात ते नित्य सोळा वर्षाचे दिसणारे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत.

बाबा आश्रमात वास्तव्यास आल्यानंतर एका भक्तास दृष्टांत झाला की, शिव-पार्वती, नंदीश्वर, तिरुपती बालाजी व बाबा हे सर्व आकाशाएवढ्या उंचीचे असून स्वर्गीय संगीताच्या साथीत सर्वजण आश्रमात प्रवेश करत आहेत. स्वत: नंदिश्वर त्या संगीताच्या तालावर जोर जोरात आनंदात मान हलवत आहे. हे सर्वजण आश्रमात आले व तिरुपीत बालाजी आश्रमाच्या जागेत प्रतिष्ठापीत झाले व त्याजागेवर दीडलक्ष गुलाब पुष्पे अंथरण्यात आली.

२०१४ साली बाबा आश्रमात खुर्चीवर बसलेले होते. अचानक बाबानी जमीनीला हात लावला व बाबा बोलले की, परमात्मा पांच पैसा दिया तो तिरुपती महापटनम हो गया, परमात्मा यहाँ पाच रुपया दिया है, असे बोलून बाबांनी आश्रमभूमी ही तिरुपती पेक्षा १०० पट आशिर्वादीत असल्याचे सांगितले.

श्रीगोपालबाबा म्हणजे स्वयं श्रीपाद श्रीवल्लभ, कबीरांच्या काळी श्रीगोपालबाबा त्यांचे गुरु स्वरुपात श्रीरामानंद होते. कबीर श्रीसाईबाबा स्वरुपात असतांना श्रीगोपालबाबा महाविष्णु व्यंकुसा गोपालराव माधवराव देशमुख म्हणून त्यांचे गुरु होते. व पिठापुरात श्रीगोपालबाबा त्याच गोपाल या नावाने अवतरले व आपल्या सर्व भक्तांच्या श्रीगुरु रुपाने कार्य करत दि. २० नोव्हेंबर २०१६ रोजी रविवारी, कार्तिक वद्य षष्टीस महासमाधिस्त झाले.

समाधीपूर्वी बाबांनी एका भक्तास दृष्टांत दिला की, बाबांच्या गाडीवर मागच्या काचेवर नाव आहे. पिठाधीपती, श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान, पिठापूर व आवाज आला की, 'पिठाधीपती मर गया.' बाबानी पूर्वीच वेळोवेळी हात लावून समाधीची जागा दाखवून दिली होती. बाबा बोलले होते की, "परमात्मा अब बुढा हो गया. परमात्मा अब रिटायर्ड होता. अब कुंडीमें बैठके काम करनेका टाईम आ गया." झाले.

समाधी पश्चात बाबांनी त्वरीत एका भक्तास आदेश दिला की, माझ्या समाधीजवळ दोन समया लाव. एकास आदेश दिला की, माझ्या समाधीस रोज भस्माने अभिषेक घालत जा. एका भक्तास आदेश दिला की, मी जे भक्तांसाठी सतत कष्ट करतो त्याने माझे अंग दुखीसाठी मला मालीश करत जावे. बाबांच्या पंचधातू मुर्ती स्थापनेनंतर बाबांनी आदेश दिला की, दर शुक्रवारी तिरुपती बालाजीस जसा पूर्णाभिषेक असतो तसाच दर गुरुवारी मला अभिषेक घालत जा. बाबांच्या २०१७ च्या प्रथम ब्रम्होत्सवापूर्वी काहीच दिवस आदी बाबांनी आदेश दिला की, मी गेलो नाही, माझी पुण्यतिथी साजरी न करता माझ्या लग्नाचा ब्रम्होत्सव ९ दिवस साजरा करावा.

समाधीतून श्रीबाबांचे विश्वकुंडलिनी जागृतीचे कार्य अखंड सुरु असून त्याची प्रचिती येणाऱ्या सर्व भक्तजनांस येत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये श्रीपादांनी सांगितले आहे की, आगामी काळात पिठापूरात मुंग्याप्रमाणे भाविक दर्शनास येतील. या भाविकांचा आधी भौतिक व अध्यात्मिक भार वहन करण्याचे कार्य श्रीगोपालबाबा समाधीतून अखंडपणे करीत आहेत. 

श्रीगोपालबाबांच्या आश्रमातील नित्य अन्नदान, विद्यादान, वस्त्रदान व गोशाळेसाठी आपला सहभाग बँक खात्यात जमा करु शकता.

State Bank of India
Shri Gopalbaba Annasantarpana Trust. 
Branch: Pithapuram, 
Account No.: 36502382299,
IFSC Code: SBIN0001003

 

Union Bank of India
Shri Gopalbaba Annasantarpana Trust. 
Branch: Pithapuram 
Account No.: 043211100002193
IFSC Code: UBIN0804321

 

विश्वस्त, श्रीगोपालबाबा अन्नसंतर्पण ट्रस्ट, 
श्रीगोपालबाबा महाराज आश्रम, पिठापूर.
संपर्क: 9133132498, 9133172498

 

- हिराचंद गोपालचंद कोठारे

 

भगवान श्री श्री श्री गोपालबाबा महाराज आश्रम, पिठापुर मधील पुजा विधी कार्यक्रम

अ) दैनंदिन कार्यक्रम 
   १) पहाटे ४ वाजता काकड आरती व बाबांच्या समाधीची सेवा
   २) गोपुजा
   ३) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना पंचामृत अभिषेक
   ४) स्वयंभु नारायण पादुका पुजन
   ५) गायत्री हवन
   ६) धुनी महाराज व श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींन महानैवेद्य अर्पण
   ७) सायंकाळी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची पालखी सेवा

 

ब) साप्ताहिक कार्यक्रम-
    १) गुरुवारी बाबांचा पंचामृताभिषेक
    २) शनिवारी सायंकाळी प्रदोष पुजा
    
क) मासिक कार्यक्रम
  १) पौर्णिमा-श्रीदत्त सत्यव्रत व अखंड धुनीला पहाटे १०८० हवन
  २) कृष्णाष्टमी-अनघाष्टमी व्रत
  ३) मासिक शिवरात्री-महारुद्राभिषेक
  ४) अमावस्या-स्वामींची विशिष्ट पालखी सेवा
  ५) चित्रा नक्षत्र-श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना रक्षा बंधन व सायंकाळी १०८ दिप प्रज्वलन सेवा
  ६) शुक्ल पंचमी-संतान प्राप्ती साठी रृषीपुजन
  ७) प्रत्येक ९ तारखेला पिठापुर सरकारी रुग्णालयात गर्भवती माता तपासणी शिबीरात अन्नदान

 

ड) वार्षिक कार्यक्रम 
 १) युगादी-गुडी पाडवा बल प्रतिपदा
 २) श्रीराम नवमी
 ३) श्रीगुरु पौर्णिमा 
 ४) राखी पौर्णिमा 
 ५) श्रीपाद जयंती
 ६) महालय अमावस्या (या दिनी आश्रमात स्वयंभु अश्वत्थ नारायण पादुका प्रकट झाल्या.)
 ७) विजया दशमी (श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची वैश्विक कार्यक्रम राबविण्यास भगवान श्री श्री श्री गोपालबाबा महाराजांचे पिठापुर येथे आगमन)
 ८) कार्तिक शुक्ल त्रयोदशी ते कार्तिक वद्य षष्ठी-भगवान श्री श्री श्री गोपालबाबा महाराज यांचा पुण्यतिथी आराधना ब्रम्होत्सव
 ९) श्रीदत्त जयंती
 १०) महाशिवरात्री

 

इ) विद्यादान- 

गरिब कुटुंबातील २०० मुला मुलींना आश्रमात शिस्तबद्ध व कार्पोरेट पद्धतीची शिक्षण व्यवस्था,

 

# Shri Gopalbaba Maharaj Pithapur, श्रीगोपालबाबा, Shrigopalbaba

#shrigopalbabamaharaj 
#hirachandgopalchandkothare

Content
वैद्य श्री देवेंद्र रामचंद्र साठे महाराज

नाव: डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे
आई / वडील: आई सुधा रामचंद्र साठे, वडील रामचंद्र शंकरराव साठे
विशेष: दिक्षाधिकारी
गुरू व मार्गदर्शक: परमपूज्य श्री सद्गुरु सच्चिदानंद स्वामी महाराज यांच्यामार्गदर्शनाखाली हठयोग, आकाशगमन आणि परकायप्रवेश यांसारख्या गूढ योगविद्यांचा अभ्यास व साधना करण्याची संधी लाभली. 
विशेष कार्य: नर्मदा परिक्रमावासी साधकांसाठी निवास, भोजन व पारायणाची उत्कृष्ट व्यवस्था शिनोर

 

दत्त सांप्रदायिक सत्पुरुष परिचय

पारंपारिक वैद्य श्री देवेंद्र रामचंद्र साठे महाराज

पारंपारिक वैद्य  श्री देवेंद्र रामचंद्र साठे महाराज हे सिद्धयोग–महायोग परंपरेचे समर्पित साधक, शक्तिपात दीक्षा अधिकारी, कुंडलिनी साधनेचे अनुभवी मार्गदर्शक आणि समाजसेवेसाठी आयुष्य अर्पण करणारे आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व म्हणून देश-विदेशात परिचित आहेत. चैतन्य जागरण, आत्मोन्नती, मानवकल्याण आणि सर्वांगीण आरोग्य या ध्येयासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे.

त्यांना प. प . श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने मंत्रदीक्षा प्राप्त झाली. तसेच परमपूज्य श्री सद्गुरु सच्चिदानंद स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हठयोग, आकाशगमन आणि परकायप्रवेश यांसारख्या गूढ योगविद्यांचा अभ्यास व साधना करण्याची संधी लाभली. पुढे श्री योगिराज पूज्य नारायणकाका ढेकणे महाराज यांच्याकडून त्यांना शक्तिपात महायोग दीक्षा आणि त्यानंतर दीक्षा अधिकार प्राप्त झाला. या दिव्य गुरु-परंपरेच्या संस्कारांमुळे त्यांच्या आध्यात्मिक जीवनाला विशेष दिशा आणि सामर्थ्य प्राप्त झाले.

त्यांचा जन्म मातृगया तीर्थ श्री सिद्धपूर येथे, श्रावण कृष्णपक्ष पंचमीच्या पवित्र दिवशी झाला. योगायोगाने हेच ते पुण्यस्थळ आहे जिथे प. प . श्री टेंबे स्वामी महाराज श्री रणछोडजी मंदिरात त्यांचे आगमन झाले होते आणि त्यांनी प्रारंभ केलेला श्रीकृष्ण जन्मोत्सव आजही भक्तिभावाने साजरा केला जातो. त्या दिव्य आध्यात्मिक परंपरेचे संस्कार त्यांच्या जीवनावर बालपणापासूनच झाले.

गुजरातमधील नर्मदेच्या पवित्र तीरावर शिनोर मुक्कामी श्री स्वामी महाराज आणि श्री गांडा स्वामी यांची प्रथम भेट झालेली जागा विशेष आध्यात्मिक महत्त्वाची मानली जाते. त्या पवित्र शिनोर गावात नर्मदा नदीच्या तीरी “श्री वासुदेव निवास” या नावाने आश्रम कार्यरत असून, नर्मदा परिक्रमावासी साधकांसाठी निवास, भोजन, पारायण व आध्यात्मिक सेवांची उत्कृष्ट व्यवस्था केली जाते. या सेवाकार्यातही श्री साठे महाराजांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे

अत्यंत साध्या आणि संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी आपल्या जीवनप्रवासाची सुरुवात केली. स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी बाहेर खाजगी नोकरी करून जबाबदाऱ्या पार पाडल्या, परंतु त्याचबरोबर समाजसेवा, आरोग्य जनजागृती, योगप्रसार आणि आध्यात्मिक कार्य यांना कधीही खंड पडू दिला नाही,  स्वतःच्या श्रमातून घर सांभाळत त्यांनी आयुष्यभर निःस्वार्थ भावनेने समाजासाठी सेवा केली आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा न ठेवता त्यांनी हजारो लोकांना आरोग्य, मानसिक स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या जीवनात सेवा हीच साधना आणि मानवकल्याण हाच धर्म राहिला आहे.

शक्तिपात दीक्षेद्वारे साधकांच्या सुप्त चैतन्यशक्तीचे जागरण करून त्यांना आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर स्थिर करण्याचे महान कार्य ते निःस्वार्थ भावनेने करीत आहेत. कुंडलिनी जागरणाच्या प्रक्रियांना त्यांनी अनुभवाधारित व तर्कसंगत दृष्टिकोनातून मांडत अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुंदर समन्वय साधला आहे.

योग, प्राकृतिक चिकित्सा, फिजिओथेरपी, पारंपरिक वैद्यक, वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि मनोविकास या विविध क्षेत्रांतील त्यांच्या सखोल ज्ञानामुळे समाजाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर संतुलन व मार्गदर्शन लाभत आहे. “शरीराचे आरोग्य, मनाची शांतता, ऊर्जेचे संतुलन आणि आत्म्याचे जागरण” हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे.

श्री साठे महाराज यांनी महाराष्ट्र, गुजरात तसेच भारतातील अनेक शहरांमध्ये व दुर्गम ग्रामीण भागात निःशुल्क आरोग्य शिबिरे, योग साधना शिबिरे, महायोग–सिद्धयोग साधना मार्गदर्शन, ध्यानसत्रे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करून हजारो गरजू लोकांना मदत केली आहे. त्यांनी आहार, विहार, मनोव्यवहार, दिनचर्या आणि भौगोलिक परिस्थितीनुसार जीवनशैली कशी असावी याविषयी समाजाला अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले आहे. निसर्गोपचार, योग, प्राणायाम आणि सात्त्विक जीवनपद्धतीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले आहेत.

ग्रामीण भागातील गरीब, गरजू आणि वंचित लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली. योग, प्राणायाम, ध्यान, नैसर्गिक उपचारपद्धती आणि मानसिक आरोग्य याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून त्यांनी समाजाला निरोगी जीवनाचा संदेश दिला आहे. अनेक लोकांना व्यसनमुक्ती, मानसिक ताणतणाव कमी करणे आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्यास त्यांनी प्रेरित केले आहे.

कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात त्यांनी निःस्वार्थ भावनेने समाजसेवा करत अनेक गरजू कुटुंबांना औषधे, अन्नधान्य, आरोग्य मार्गदर्शन, मानसिक आधार आणि आवश्यक मदत उपलब्ध करून दिली. लॉकडाऊनच्या काळात लोकांमध्ये सकारात्मकता, मानसिक स्थैर्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांनी ऑनलाइन व प्रत्यक्ष योग, प्राणायाम आणि आरोग्य जनजागृती मोहिमा राबवल्या.

गुजरातमध्ये भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तसेच नद्यांना आलेल्या महापुराच्या संकटसमयी त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्य करत अन्न, औषधे, निवारा, आरोग्य सेवा आणि पुनर्वसनासाठी मोलाचे योगदान दिले. संकटकाळात मानवतेची सेवा हीच खरी साधना मानून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा विस्तार भारतापुरता मर्यादित नसून ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा आणि युरोप येथेही त्यांनी योग, ध्यान, महायोग–सिद्धयोग आणि आरोग्य शिबिरे आयोजित करून भारतीय अध्यात्म आणि योगविद्येचा जागतिक स्तरावर प्रसार केला आहे.

पारंपारिक वैद्य श्री देवेंद्र रामचंद्र साठे महाराज यांनी अध्यात्म, योग, निसर्गोपचार, आरोग्यसेवा, जनजागृती आणि मानवकल्याण या क्षेत्रांत केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी, उल्लेखनीय आणि राष्ट्रहिताचे आहे, अत्यंत साध्या जीवनातून संघर्ष करत स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी आयुष्यभर निःस्वार्थ सेवाभावाने समाजासाठी कार्य केले आहे,कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अपेक्षेशिवाय त्यांनी लाखो लोकांना आरोग्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे.

त्यांच्या कार्यामध्ये सेवा, साधना, करुणा, ज्ञान आणि मानवतेप्रती असलेली अखंड निष्ठा यांचा अद्वितीय संगम दिसून येतो. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी ग्रामीण ते शहरी तसेच देश-विदेशात निरंतर कार्य करत योग, महायोग-सिद्धयोग, निसर्गोपचार आणि आध्यात्मिक जागृतीचा प्रसार केला आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले असून समाजाला निरोगी, संतुलित आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम जीवनाचा मार्ग प्राप्त झाला आहे.

वैद्य श्री देवेंद्र रामचंद्र साठे महाराज

प्राप्त सन्मान व पुरस्कार

  • इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड, मुंबई
  • नॅशनल आरोग्य रत्न, मुंबई
  • चिकित्सा रत्न अवॉर्ड, मुंबई
  • नॅशनल निसर्गोपचार प्राईड अवॉर्ड (MNC)- ३ वेळा
  • मानद डॉक्टरेट पदवी- विश्वकर्मा विद्यापीठ
  • सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट– वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन
  • मानद डॉक्टरेट– बुक ऑफ रेकॉर्ड्स, नवी दिल्ली
  • नॅशनल अॅस्ट्रो स्पिरिच्युअल अवॉर्ड, अहमदाबाद
  • बेस्ट अॅस्ट्रोलॉजर ऑफ द इयर, अहमदाबाद
  • बेस्ट वास्तु एक्सपर्ट ऑफ द इयर, अहमदाबाद
  • अॅस्ट्रो प्लॅटिनम गोल्ड स्टार अवॉर्ड (आंतरराष्ट्रीय)
  • ब्रह्म महर्षि अवॉर्ड (आंतरराष्ट्रीय)
  • इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड
  • आयुष योगाचार्य महासन्मान पुरस्कार
  • इंडियन ग्रोथ लीडर अवॉर्ड, अहमदाबाद
  • लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, लंडन
  • मानद डॉक्टरेट- LBSS लंडन UK (Physiotherapy and Naturopathy)
     

तसेच विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक समाजसेवा सन्मान प्राप्त आहेत.

||श्री गुरुदेव दत्त||

 

# Dr Devendra Ramchandra Sathe, Sathe Maharaj, Vaidya Shri Devendra Ramchandra Sathe

 

Content
श्री देवीदास गंगाधर जोशी

संपूर्ण नाव: देवीदास गंगाधर जोशी 
आई/वडील: सौ  कमल व श्री गंगाधर जोशी
दीक्षा गुरू: प पू  ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर
कार्यकाळ: नोव्हेंबर १९६६ ते आजपर्यंत  कार्यरत
सत्पुरुष सहवास  व मार्गदर्शन 

१) प पू गुळवणी महाराज 

२) प पू मामासाहेब देशपांडे 

३) दत्तमहाराज कवीश्वर 

४) प पू ढेकणे काका  

५) शरद जोशी
मूळ गाव: लातूर असले तरी गेल्या  पस्तीस वर्षांपासून पुणे येथे वास्तव्य आहे.

 

त्यांचे घराण्यात मागच्या पाच पिढ्यांपासून श्री दत्त उपासना. तसेच माहूर च्या रेणुका देवीची दैवी कृपा व आशीर्वाद आहेत.

त्यांना त्यांचे कार्यकाळात श्री दत्त संप्रदाय,नाथ संप्रदाय,शक्ती संप्रदाय मधील अनेक श्रेष्ठ अधिकारी सत्पुरुषांच मार्गदर्शन व कृपा आशीर्वाद  लाभले.

देवीदास जोशी यांच्या मातोश्री सौ. कमल गंगाधर जोशी या पूज्य श्री गुळवणी महाराजांच्या अनुग्रहीत होत्या व  अनुसरूनच त्यांना शक्तिपात व दत्तकृपेचा वारसा लाभला.

प पू जोशी यांना प्रथम 1971 जानेवारीत प. पू. श्री गुळवणी महाराजांचे दर्शन, कृपा आशीर्वाद लाभले. पुढे 1987 सप्टेंबर मध्ये प. पू. श्री दत्त महाराज कवीश्वर यांचेकडून शक्तिपात व मंत्र दीक्षा झाली. ब्रम्हर्षी  दत्तमहाराज यांचे दीर्घकाळ म्हणजे सुमारे बारा वर्षे त्यांचा सहवास तसेच मार्गदर्शन लाभले.

1989 ऑक्टोबर महिन्यात प. पू. मामासाहेब देशपांडे महाराजांनी त्यांच्या माऊली आश्रमात स्वतः श्री वासुदेव निवासातून नेले व त्यांना भगवान श्रीपादश्रीवल्लभ यांनी कुरवपूर येथे दिलेल्या पादुका दाखवून दर्शन घ्यावे अशी आज्ञा केली. साधारण त्याच सुमारास परमपूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांनी  माऊली येथे देवीदास जोशींना  बोलाऊन परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराजांनी देविदास जोशींच्या डोक्यावर  हात ठेवला दिव्य अनुभूती दिली, आणि साधना नित्य करत जा, आमचे लक्ष आहे अशी आज्ञा दिली, आणि आशीर्वाद दिले.

परमपूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांकडून ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची आज्ञा केली आणि याबरोबरच शक्तीपात संप्रदाय याची साधना सुद्धा उत्तम प्रकारे होवो असे आशीर्वाद दिले. पुढे सन 1990 नंतर परंपरेच्या आज्ञाने माऊली येथील देवांच्या पूजेचे भाग्य तब्बल दीड/दोन वर्षे लाभले. या सर्वांचा परिपाक म्हणून पुढे परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराजांनी 2009 मध्ये शक्तिपात दीक्षा देण्याचे अधिकार दिले.

श्री वासुदेव निवास पुणे हे भारतातील शक्तिपात संप्रदायाचे आद्यपीठ आहे 
प.पू. श्री गुळवणी महाराज पूज्य  श्री दत्त कवीश्वर महाराज, पूजनीय श्री नारायण काका ढेकणे महाराज यांचा  कृपालोभ अनेक वर्षे लाभला.

परंपरेचे कार्य चालु आहे.

सध्या श्री वासुदेव निवास पुणे या प. पू. योगीराज गुळवणी महाराज यांनी स्थापन केलेल्या आश्रमाचे विश्वस्त म्हणून काम सुरू आहे.

महाराष्ट्र ,गुजरात, आंध्र, कर्नाटक सगळीकडे विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचने, शक्तिपात या विषयावर प्रवचने श्री दत्त संप्रदायातील अनेक भक्त,साधक,मुमुक्षना  मार्गदर्शन करीत आहेत. हे सगळे कार्य या आपल्या दिव्य परंपरेचे शक्ती  करून घेते अशी देविदास जोशीं ची भावना आहे आणि अशीच दत्त संप्रदायाची सेवा होवो हीच त्यांची धारणा आहे.

श्रीलोकनाथतीर्थस्वामी महाराज आणि प. प. योगिराज गुळवणी महाराज यांच्या परंपरेतील एक व्यासंगी वक्ते आणि साधक आहेत. त्यांनी 'शक्तीपात योग' आणि 'चरित्र चिंतन' या विषयांवर आपले प्रबोधन केले असून, आध्यात्मिक क्षेत्रात भक्ती आणि साधनेचा संदेश दिला आहे. भक्तीच्या मार्गाने साधनेचे महत्त्व समजावून सांगणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. ते  प्रामुख्याने शक्तिपात परंपरेतील (नारायणी परंपरेतील) साधक आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात.

श्री दत्तमहाराज यांचे आशीर्वादाने त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे  हीच श्रीचरणी प्रार्थना !

 

शुभम  भवतु

 

निवासपत्ता: फ्लॅट नंबर 09, मोहिते टाऊनशिप A बिल्डिंग, माणिकबाग, सिंहगड रोड पुणे 
मोबाईल नंबर: 9850716216

 

Shri Devidasji Joshi

 

Content


 

प. पु. परमहंस श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज

सत्पुरुष: प. पु.परमहंस श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज
गुरू: प पु शंकर स्वामी, नृसिंहवाडी वाडी येथे सन्यास दीक्षा  १९६४ - ६५
समाधी: १५ सप्टेंबर २०१०

 

गेल्या यांच सहा हजार वर्षांत अनेक संस्कृति प्रत्यक्षात आल्या पण त्यांच्या पैकी "भारतीय संस्कृति" एक अतिप्राचीन, महान संस्कृति असून, अनेक चढउतार तिच्या आयुष्यात आले तरी अजून पर्यंत तिचा प्रभाव भारतीयांच्या हृदयात टिकलेला आहे त्याचे खरे कारण म्हणजे तिच्या अंतरंगात "अध्यात्म विद्येला" सर्वश्रेष्ठ स्थान आहे. वास्तविक पाहता मानवी जीवनाला योग्य वळण देऊन माणसाला खऱ्या अथनि माणूस बनवण्याचे काम संस्कृतिच करित असते.

सध्याच्या काळात “विज्ञान संस्कृति” ने आपला संसार थाटून समाजाचे व्यवहारिक जीवन जरी बदलून टाकले आहे तरी एक प्रकारची अशांती, अपूर्णता, अतृप्ती सतत् माणसाला घेरून टाकते आहे. बरेचसे सनातन प्रश्न- मी कोण, माझा खरा संबंधी(आप्त) कोण, मानवी जीवनाचे अंतीम ध्येय कोणते, हे विज्ञानाच्या शिखरावर आरूढ झालेल्या आजच्या मानवाला सुटलेले नाहीत. ह्या कारणाने देहाच्या सुखसोयी असून सुद्धा माणसाच्या मनाला खरे समाधान लाभलेले नाही. जेथे समाधान नाही, तेथे शांती कशी असणार, ती असूच शकत नाहीं.

देहाच्या गरजा भागल्यानंतर फक्त अध्यात्म चिंतनानेच मनुष्याला जीवनाचा खरा अर्थ समजू शकतो. अर्थ समजला की त्याचे प्रश्न सुटतात आणि मग ब्रह्मविद्येच्या उपासनेने त्याला पूर्ण शांतीचा प्रत्यक्ष अनुभव येतो, हा आत्मतत्वाचा बोध किंवा आत्म साक्षात्कार सत्याचा शोध घेणाऱ्या भारतीय ऋषी मुनींना उपनिषदकाली झाला. ब्रह्मविद्येची ही परंपरा भारतामधे आजपर्यंत सतत् चालली आहे. ही "ब्रह्मविद्या" ज्याच्या ठिकाणी साकार त्याला "सदगुरु" किंवा "संत" म्हणतात म्हणून संत हेच भारताचे आदर्श पुरुष होय. ही विद्या गुरु-शिष्य पराम्परेनेच आजपर्यंत अव्याहत चालू आहे व पुढे ही चालू राहील व "सदगुरु वाचोनी सापडेना सोय ! धरावे ते पाय आधी!!" हृयाची पूर्ण प्रचिती येईल.

बाह्यांगाने पाहिले तर संत व सामान्य माणसाच्या जीवनात विशेष फरक दिसेलच असे नाही पण दोघांच्या अंतरंगात मात्र जमीन आसमानाचा फरक असतो. सामान्य माणसाचे मन कर्म करताना फळाच्या आशेत गुंतून पडते तर संतांचे मन "सच्चिदानंद ब्रह्म" ची साक्षात अनुभूति असल्यामुळे कर्तव्या पुरतेच कर्मांत राहून कर्माचे फळ भगवंताला अर्पण करुन (हरि अर्पणम्), स्वतः वेगळे राहतात अर्थात सामान्य माणसाला देहबुद्धीमुळे अशांति, असमाधान राहते तर संतांचे जीवन आत्मबुद्धीमुळे शांति, समाधान व परमानंदाने भरून जाते.

पुण्य भूमि व परम पवित्र अश्या भारतवर्षांत भगवंताचे अनेक अवतार होऊन गेले पण भगवान दत्तात्रेय मात्र भक्तांच्या रक्षणासाठी सदैव ह्या भूतलावर वास्तव्य करत असतात. भगवान दत्तात्रेय हे सृष्टिचे सृजन, पालन व संहार करतात. भगवान दत्तात्रेय कृत युगात अत्रि आणि अनुसूया ह्यांच्या तपश्चर्या व भक्तिने प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या रूपात अवतरले. हे सर्वांचे आदी व परम-गुरु आहेत. जन्म मरणास कारण असलेले "अज्ञान" त्याचा नाश करून भक्तांना कैवल्यपद देण्यासाठीच हा अवतार झाला. त्यांचे अनन्य भक्तिने स्मरण करताच ते प्रत्यक्ष येऊन भक्तांना सर्व संकटातून मुक्त करून त्यांचे अभीष्ट पूर्ण करतात व शाश्वत सुख पण प्रदान करतात.
भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी आंध्रप्रदेशात पीठापुर क्षेत्री "श्रीपाद श्रीवल्लभ" ह्या नावाने प्रगट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. त्यानंतर कांरजा क्षेत्रात "श्री नृसिंह सरस्वती" ह्या नावाने दूसरा अवतार घेऊन अदभुत चरित्र दाखविले ज्याचे वर्णन सरस्वती गंगाधर रचित "श्रीगुरुचरित्र" ह्या ग्रंथात ओवीबद्ध आहे. हा ग्रंथ म्हणजे पांचवा वेदच. ह्या प्रासादिक ग्रंथाच्या पारायणाने अनेक दत्त भक्तांना संसाररूपी भवसागरातून मुक्ति मिळाल्याची साक्ष आहे. श्रीदत्तगुरुंचा तिसरा अवतार "श्री माणिक प्रभु". हे फार ऐश्वर्यसम्पन्न राजयोगी होते. श्री दत्तगुरुंचा चौथा अवतार, अक्कलकोटचे "श्री स्वामी समर्थ महाराज". ह्यांची अवधूत वृत्ति असे व हे तरुतलवास करत असल्या मुळे "वटवृक्षस्वामी" म्हणून ह्यांची ख्याति होती.

ह्यानंतर परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज म्हणजे स्वयं दर अवतारच. त्याचे संपूर्ण चरित्र म्हणजे श्रीदत्तप्रभूच्या आदेशाचे केवळ प्रतिपालन होते. स्वामी एक महान तपस्वी असून धगधगीत वैराग्य त्यांच्या नसानसात भिनले होते. स्वामी महाराजानी भक्तजनोद्धारणार्थ स्तोत्रादी संग्रह, दत्तपुराण, दत्तमहात्म्य, द्विसाहस्त्री गुरुचरित्र, समश्लोकी गुरुचरित्र इत्यादि संस्कृत व प्राकृत ग्रंथ भांडारच उपासकांच्या हाती दिले. त्यांचे संन्यासी शिष्य श्री दीक्षित स्वामी व श्री दिक्षीत स्वामीचे संन्यासी शिष्य श्री शंकर स्वामी व श्री शंकर स्वामींचे संन्यासी शिष्य म्हणजे आमचे सद्‌गुरु "प. पू. परमहंस श्री दत्तानंद स्वामी महाराज".

प. पू. परमहंस श्री दत्तानंद स्वामी महाराज यांच्या कार्याचा अल्प परिचय

देहधारी भुवि प्राप्तौ यतीरुपेण चात्रिज: | कलौ भक्तां समुद्धर्तु दत्तानंद नमोस्तुते ||

परमहंस श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज हे मूलतः महाराष्ट्राचे असून त्यांच्या पूर्वाश्रमासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु काही ज्येष्ठ साधकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे जन्मगाव बार्शी होते व त्यांच्या वडिलांचे नाव भगवान किंवा भगवंत असावे असे समजते.
युवावस्थेत प.पू. श्री दत्तानंद स्वामी महाराज रॉयल इंडियन एअरफोर्स मध्ये नोकरी करत होते. एअर फोर्स मध्ये त्याकाळी भारतीय लोकांना मिळणारी भेदभावाच्या  वागणूकीविरुद्ध झालेल्या संपामध्ये त्यांनी भारतीय लोकांचे नेतृत्व केले होते, व त्यात यश मिळून भारतीय लोकांना सन्मानाची आणि भेदभावरहीत वागणूक मिळू लागली.

नोकरी करत असता, एकदा गुरुचरित्राच्या सप्ताहासाठी सुट्टी न मिळाल्यामुळे त्यांनी नोकरीचा त्याग केला व साधनेसाठी शिर्डीत आले. शिर्डीत श्वेत वस्त्र व जटाधारी ब्रह्मचारी अशा रूपात त्यांचे वास्तव्य असे. १९६४ मध्ये शिर्डीच्या साईमंदिरात असताना त्यांना दृष्टांत झाला कि तुम्ही श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे प.पू श्री शंकर स्वामींची भेट घ्यावी. त्याप्रमाणे प.पू. श्रीदत्तानंद  स्वामी महाराज, श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे, प. पू. श्री शंकरस्वामीं महाराजाना भेटले व दृष्टांताप्रमाणे येथे त्यांना सद्गुरू भेट झाली. प. पू. श्री शंकर स्वामींकडून त्यांनी श्री क्षेत्र नरसोबावाडी येथेच श्रीकृष्णानदीच्या तीरी १९६४-६५ च्या सुमारास विधिवत होमहवन व इतर संस्कारपूर्वक संन्यासाची परमहंस दीक्षा ग्रहण केली.    

त्यानंतर प. पू. श्री दत्तानंद स्वामीमहाराज  अनेक ठिकाणी भ्रमंती करत असत. विनाकारण येणारी उपाधी टाळण्यासाठी, वरकरणी उग्र व संतापी, असे रूप त्यांनी स्वीकारले होते. परंतु भक्तांसाठी अत्यंत प्रेमळ आणि कल्याण करणारी, त्यांचे पाप व संसारातील ताप दूर करून, त्यांची वृत्ती भगवद्भक्ती कडे लागण्यासाठीचा मार्ग प्रशस्त करणारी अशी "कलौ भक्तान समुद्धर्तु" अशी ही यतीमूर्ती असे. 

१९६५ सालच्या सुमाराला महाराज कल्याण येथे आले. तेथे त्यांचा मोठा शिष्य सम्प्रदाय होता. कल्याणला त्यांनी मठाची स्थापना केलेली होती व तेथे नित्य पूजा आरती वगैरे चालत असे. १९६६ च्या सुमाराला त्यांचे बडोदा येथे आगमन झाले व त्यांनी श्री पुरोहित यांचे घरी चातुर्मास केला व तसेच त्यांच्या घरी वासुदेव मठाची स्थापना केली. तथापि त्यांची भ्रमंती सतत चालू असे आणि नागपूर, चांदोंद, गरुडेश्वर इत्यादी ठिकाणी त्यांचे वारंवार येणे जाणे असे.  

त्यानंतर १९६७ साली  प. पू. श्रीदत्तानंद  स्वामी  महाराज यांचे ग्वाल्हेर येथे आगमन झाले व तेथे त्यांनी श्री गुर्जर यांच्या घरी वास्तव्य व मठाची स्थापना केली व अनेकांना मार्गदर्शन केले. त्यांचे पट्टशिष्य प. पू .श्री. तेलंग स्वामी महाराज यांची ग्वाल्हेर मुक्कामीच स्वामींची भेट झाली व १५ फ़ेब्रुवारी १९६९ रोजी त्यांना प. पू. श्रीदत्तानंद  स्वामी  महाराजांकडून अनुग्रह प्राप्त झाला. तदनंतर १९७२ साली  प. पू. श्रीदत्तानंद  स्वामी महाराज भोपाळ येथे आले आणि ३/१९३ अरोरा कॉलनी येथे श्री शिंगवेकर यांच्या घरी मठांची स्थापना केली. तसेच १९९९ च्या सुमारास इंदोर येथे वासुदेव नगर येथे मठ स्थापना केली. दोन्ही ठिकाणी त्यांचा मोठा शिष्य परिवार आहे.

 

इंदौर येथे वासुदेव नगर येथील मठात सन १९८५ पासून दत्तजयंती, गुरुपौर्णिमा व इतर उत्सव  प. पू. श्रीदत्तानंद  स्वामीमहाराजांचे आज्ञेने साजरे होऊ लागले व भक्तांची मांदियाळी होऊ लागली.

प.पू. श्रीदत्तानंद स्वामी महाराजानी १९६५ ते २०१० पर्यंत सतत भ्रमण करून लोकांना आध्यात्मिक मार्गावर अग्रेसर केले. त्यांनी कल्याण, पुणे, मुंबई, नागपूर, अकोला, बडोदा, ग्वाल्हेर, इंदौर, भोपाळ, बडोदा व इतर अनेक ठिकाणी संचार केला. या स्थानी त्यांचा शिष्य परिवार होता व अजूनही आहे.

भाद्रपद शुक्ल अष्टमी (दिनांक १५/०९/२०१०) रोजी प. पू. श्रीदत्तानंद स्वामी महाराज ब्रह्मलीन झाले. संन्यासी असल्यामुळे त्यांचे पार्थिव शरीराला यथाविधी, श्री क्षेत्र मंडलेश्वर येथे श्री नर्मदा पात्रात विधिवत जलसमाधी देण्यात आली.

त्यानंतरच्या काळात २००-२५० सदस्यांची नोंदणीकृत संस्था "श्री दत्तानंद सेवा मंडळ ट्रस्टची दिनांक ३१/०५/२०१२  स्थापना झाली असून प. पू. श्रीदत्तानंद  स्वामी महाराजांचे कृपाप्राप्त व प्रपन्न शिष्य श्रीमद सद्गुरु श्री तेलंग महाराज ह्यांच्या मार्गदर्शन व सानिध्यामध्ये गुरुपौर्णिमा, दत्तजयंती तसेच रामनवमी आणि जन्माष्टमी आदी उत्सव अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात.

 

संस्थेचा पत्ता व संपर्क क्रमांक - 

श्री. अवधूत दत्त मंदिर, स्वामी दत्तानंद सेवा मंडळ ट्रस्ट
G357/358, कालिंदी गोल्ड कॉलनी ,अरविंद मेडिकल कॉलेजसमोर, उज्जैन रोड,  इंदोर (मध्य प्रदेश)
संपर्क क्रमांक : 9685186441, 9329889046, 7987262801

प. पू. दत्तानंद स्वामी महाराजांची आरती

ओवाळू आरती श्री सद्‌गुरूराया ब्रम्हस्वरूपी सद्‌गुरूनाथा श्री दत्तानंदा ।।ध्रु.।।


व्रत घेवोनीया जन सेवेचे गृह त्याग करिती । गाणगाभुवनी दत्ता सन्निध्य जाऊनियां बसती योगिंद्राचे स्वरूप होऊनी भ्रमणाला निघती अंतर्यामी तळमळ मोठी बांधव या साठी ||1||ओवाळू..
जागो ज़ागी भक्तजनांचा मेळावा करिती अज्ञानाचे तिमिर सारण्या उपदेशा देती ईशत्वाचे स्वरूप होऊनी मानवांस देती भ्रमांत पडल्या मानवतेला प्रकाशांत घेती ।।2।।ओवाळू..
साक्षात्कार करवूनी भक्तां ईश दर्शनाचा भक्तवरचे संकट टाळी आनंद कंदाचा नारायण दत्तात्रेय स्वामी वासुदेवाचे सतत चालते नाम मुखिया दत्तानंदाचे ।। 3।।ओवाळू..
भजनांवरती बहुत प्रिती भान न समयाचे भक्तवृंद ही सवे गातसे गजर श्रीहरीचे भक्तासंगे आचार धर्मा वरी कटाक्ष फार जरी क्रोधला तरी ते हृदयी आत्मीयता ही फार ।।4।। ओवाळू..
लक्षुनी भिक्षा भक्त आमंत्रिती स्वामीरायाला परी धन्यतो स्वामी मांगे षड्रिपु भिक्षेला ऐश्यापरि ते उद्धरताती आपुल्या भक्तांना त्यांचे चरणी भक्त ठेवीती पदोपदी माथा ।।5।। 

 

ओवाळू आरती श्री सद्‌गुरूराया ब्रम्हस्वरूपी सद्‌गुरूनाथा श्री दत्तानंदा ।।ध्रु.।।

 

P. P. Paramhans Shri Dattanand Saraswati Swami Maharaj

Content
दत्तमहाराजस्य पञ्चधातुमूर्तिं, श्री दत्त पादुका मंदिर निगवे खालसा

या मंदिरा बाबत पोथीतील उल्लेख पाहू

|| दिगम्बर दिगम्बर श्रीपाद वल्लभ दिगम्बर ||

१९ शताब्द्याः आरम्भे ग्रामस्य कुलकर्णीपरिवारस्य एकः महान् दत्तभक्तः स्वर्गं गतः । 
सः प्रतिदिनं दत्तमहाराजस्य पाठं, पूजां च करोति स्म । दत्तप्रभु प्रति तस्य अगाधः विश्वासः आसीत् । 
सः प्रत्येकं पूर्णिमादिने नरसबावाडीं प्रति पदातिमात्रेण डिण्डीम् अकुर्वत् । 
कालान्तरे यथा यथा सः वृद्धः अभवत् तथा तथा दीर्घयात्रा तस्य कृते असह्यम् अभवत् । 
तस्य वयसानुसारं नरसबावाडीं गन्तुं न शक्यते स्म । 
यथा अपेक्षितं सः स्वजीवनस्य प्रथमं पूर्णिमादिनं त्यक्तवान् । 
चञ्चलचित्तेन सः सर्वं दिवसं दत्तमहाराजस्य गम्यमानस्य डिण्डी इत्यस्य विषये चिन्तयन् आसीत् । 
तस्य मनः पश्चातापं अनुभवितुं आरब्धवान् ।
सः सर्वं दिवसं गृहे चञ्चलः उपविष्टवान्, दत्तमहाराजस्य विषये चिन्तयन् ।
तथा च रात्रौ निद्रां गच्छन् अपि सः गम्यमानस्य डिण्डी इत्यस्य विषये चिन्तयन् एव आसीत्....
सः गम्यमानस्य डिण्डी इत्यस्य विचारं मनसि कृत्वा निद्रां गतः। 
पश्चात् तस्याः रात्रौ दत्तमहाराजः स्वयमेव तस्मै स्वप्ने दर्शनं दत्त्वा अवदत् यत् "भवतः नरसबावाडी-नगरम् आगन्तुं न प्रयोजनं भविष्यति। 
मम उपस्थितिः भवतः गृहे एव अस्ति। 
भवतः पृष्ठाङ्गणे मृत्तिकायाः राशे मम स्वयंभू पादुकान् प्राप्स्यसि । 
तदनन्तरं महाराजेन दत्तदृष्ट्यानुसारं गृहस्य पृष्ठाङ्गणे खननं कृतम् । 
स्वयम्भु पादुकाः तत्र प्राप्ताः। अतीव प्रसन्नहृदयेन सर्वे भक्ताः तस्य जीवनं स्थापयित्वा लघुमन्दिरं निर्मितवन्तः । 
अधुना दुःखदावस्थायां सर्वे भक्ताः दत्तमहाराजस्य पञ्चधातुमूर्तिं स्थापितवन्तः। 
ततः परं अद्यापि बहवः भक्ताः अनुभवन्ति यत् दत्तमहाराजः विपत्तौ सर्वेषां भक्तानां पार्श्वे तिष्ठति इति ।
प्रत्येकं पूर्णिमायां दत्तमहाराजः अभिषिक्तः पूजितः च भवति । पौर्णिमप्रसादः भक्तेभ्यः दीयते। तथैव दत्तजयन्तीयां ८ तः १० सहस्राणां भक्तानां साक्षिणा दत्तजयन्ती आचर्यते ।

दिगम्बर का शाश्वत अवतार ! सः जगतः स्वर्णमन्दिरं सृजति ! यदि श्रद्धा अस्ति तर्हि शिवे सत्यं मिलिष्यसि, तदा दत्तः दयालुः भविष्यति.

 

जरा याबद्दल माहिती ती अशी,

19 व्या शतकाच्या प्रारंभिस निगवे  गावामध्ये कुंभारगल्ली मध्ये कुलकर्णी घराण्यात एक मोठे दत्त भक्त होऊन गेले. त्यांचे दर दिवशी नित्य पठण व दत्त महाराजांची पूजा करत असत. दत्त प्रभुवर नितांत श्रद्धा होती. ते दर पौर्णिमेला नरसोबावाडीला एकटे पायी दिंडी करत होते.  कालांतराने त्याचे वय होत गेले येवढ्या लांबचा प्रवास त्यांना झेपेनासा झाला. नरसोबावाडीला जाण्यास त्यांना वयोमानानुसार जाणे शक्य होत नव्हते. यथा आवकशने त्यांची आयुष्यातील पहिली पोर्णिमा चुकली. अस्वस्थ मनाने सतत दत्त महाराजांच्या चुकलेल्या दिंडीचा विचार दिवसभर करत होते. मनाला खंत वाटू लागले.

दत्त महाराजांच्या विचारात खेद भावनेने घरामध्ये दिवसभर अस्वस्थ बसून राहिले. व  रात्री झोपी जाताना सुद्धा त्यांच्या मनात सतत चुकलेल्या दिंडीचाच विचार... चुकलेल्या दिंडीची सल मनात ठेवून ते झोपी गेले. त्यानंतर त्या रात्री स्वतः दत्त महाराजांनी त्याच्या स्वप्नात मध्ये दृष्टांत देवून हे सांगीतले की, "तुला आता नरसोबावाडीलां येण्याची गरज भासणार नाही तुझ्या घरातच माझे अस्तित्व आहे. तू तुझ्या परसदारी असणाऱ्या मातीच्या ढीगा मध्ये तुला माझ्या स्वयंभु पादुका सापडतील."

यानंतर महाराजांनी दिलेल्या दृष्टंतानुसार घराच्या परसदारी खोदकाम केले असता. तेथे स्वयंभु पादुका सापडल्या अत्यंत हर्षित मनाने सर्व भक्तांनी त्याची प्राण प्रतिष्ठापना करून छोटेसे मंदिर ऊभा केले. आता सद्द् स्थितीला सर्व भक्तांनी दत्त महाराजांची पंचधातूची मूर्तीची स्थापना केली आहे त्यानंतर ते आज पर्यंत दत्त महाराज सर्व दत्त भक्तांच्या पाठीशी संकटकाळी ऊभा राहण्याची प्रचिती आजही अनेक भक्तांना येते.

दर पौर्णिमेला दत्त महाराजांचा अभिषेक व पूजा केली जाते. पौर्णिमा प्रसाद ही भक्तांना दिला जातो.त्याचप्रमाणे दत्त जयंती दिवशी  8 ते 10 हजार भक्तांच्या साक्षीने दत्त जयंती पार पडते.

चिरंजीव अवतार दिगंबर !करील जगाचे सुवर्ण मंदिर !श्रद्धा असता सत्य शिवावर भेटतील मग दत्त दयाघन...

सर्व दत्तभक्तांनी या परमपवित्र मंदिरास अवश्य भेट देऊन प्रासादिक अनुभूती घ्यावी. 
।। श्री  गुरू शरणं ।।

 

श्री दत्त पादुका मंदिर निगवे खालसा

कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर पासून 25 किमी 
• निगवे खालसा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर 
• निगवे खालसा, श्री दत्त मंदिर कुंभारगल्ली 
Mobile: 9764352337
Google Location 
https://maps.app.goo.gl/grAaRShf6CM8sytb6?g_st=aw

 

श्री दत्त पादुका, श्री दत्त पादुका मंदिर निगवे खालसा
श्री दत्त पादुका, श्री दत्त पादुका मंदिर निगवे खालसा
श्री दत्त पञ्चधातुमूर्तिं, श्री दत्त पादुका मंदिर निगवे खालसा