श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ

श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ (सद्गुरु श्रीशंकर बाबांचे प्रिय शिष्य)
श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ (सद्गुरु श्रीशंकर बाबांचे प्रिय शिष्य)

श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ (सद्गुरु श्रीशंकर बाबांचे प्रिय शिष्य)

श्रावण शुद्ध अष्टमी हा दिवस शंकर भक्तांना विशेष महत्त्वाचा पण याच दिवशी महाराजांचे अतिशय प्रिय, अत्यंत लाडके व जनार्दन बुवांचे म्हणजे जनु काकांचे चिरंजीव व शुभराय मठाचे मठाधिपती महंत श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा आपल्या सर्वांना सुपरिचित असलेल्या श्री मधु बुवांची पुण्यतिथी.

मधु बुवांचा जन्म कार्तिक वद्य प्रतिपदा इ.स. १९२३ सालचा. मधुबुवांना आपल्या वयाच्या अगदी पहिल्या वर्षापासूनच श्रीशंकर महाराजांचा सहवास लाभला. श्रीशंकर महाराज बरोबर एक वर्षा आधी म्हणजे १९२२ साली प्रथम शुभराय मठात आले. महाराज त्यांच्याबरोबर खेळत असत. महाराजांनी हसत खेळतच त्यांच्यावर कृपा केली. त्यांना त्यासाठी काहीही तपश्चर्या करावी लागली नाही. म्हणजे मधुबुवा हे कृपासिद्ध होते. मधु बुवा आणि त्यांचे बंधु पुरुषोत्तम हे मठाजवळील शाळेतच जायला लागले‌. त्यांचा मित्रपरिवार वाढायला लागला.जनू बुवा व शंकर महाराजांना भेटायला येणारी माणसे ही मुले पाहत होती. संतकुळातील जन्माचे भाग्य ही मुले भोगत होती. बालगंधर्व, भास्करबुवा बखले, भोरचे राजे, यल्लूबाई, आप्पा मेहेंदळे, डॉ धनेश्वर अशा अनेक मोठमोठ्या व्यक्तिंचा सहवास या मुलांना लाभत होता.मधु बुवांचे शिक्षण १० वी पर्यंत झाले‌. त्यावेळी शंकर महाराज आपल्या सर्व शिष्यांना शुभराय मठात पाठवायचे‌. मधु बुवा त्यांच्या बरोबर अक्कलकोट,पंढरपूर व तुळजापूरला जायचे. त्यामुळे मधुबुवा मठातच जास्त रमले.

१९३८ ला जेव्हा जनार्दन बुवांनी देह ठेवला तेव्हा मधु बुवांचे वय अवघे १५ वर्षांचे होते. परंतु श्रीशंकर महाराजांनी मधु बुवांच्या गळ्यात मठाधिपतीची माळ घातली व त्यांना स्वत:च्या मांडिवर बसवून तारक मंत्राचा उपदेश केला. मधु बुवांचे पितृ छत्र हरविले. फार लहान वयातच मठाची जबाबदारी घ्यावी लागली.श्री शंकर महाराजांनी जनू बुवांना बघताक्षणीच भगवत दर्शन दिले तर मधु बुवाला अत्यंत प्रेमाने घडवले. श्री शंकर महाराजांच्या कृपाछत्राखाली पारमार्थिक विकासाची पायरी ते चढले. मधु बुवा देवाची पुजा करायला शिकले. देवांना सुंदर पोशाख ते घालायचे,देवघर सुंदर सजवायचे .मठाचे उत्सव ते अतिशय उत्साहात आनंदात साजरा करायचे. उत्सवाची सांगता मठात पूर्वीपासून काल्याच्या किर्तनाने होते. एका उत्सवात शंकर महाराज मठात होते. मधु बुवांना त्यांनी कीर्तनाचे सामान आणायला सांगितले. मला कफनी घाल,फेटा बांध आणि चिपळ्या माझ्या हातात दे. स्वारी कीर्तनाच्या वेशात सजली. पुन्हा महाराज म्हणाले,आता हे कपडे काढ आणि तू घाल.झाले! परत ते कपडे मधु बुवांनी घातले. हातात चिपळ्या घेतल्या, उभे राहिले. शंकर महाराज म्हणाले "म्हण आता जय जय राम कृष्ण हरी हं आता पुढे तुला किर्तन करायचे आहे बरं का!" झाले मधु बुवा हळूहळू किर्तन करायला शिकले. उत्सवाच्या काल्याची किर्तने, रामनवमी,कृष्णजन्माष्टमी, शुभराय महाराज पुण्यतिथी आदि उत्सवात     सर्व कीर्तन मधुबुवा करत. काही काळानंतर बुवांनी राष्ट्रीय किर्तनकार म्हणुन पाच वर्षे काम केले. तेव्हा सहा सहा महिने बाहेर रहावे लागत असे. उत्पन्न काहीच नाही. मठाकडे दुर्लक्ष म्हणून त्यांनी राजीनामा दिला.

१९९६ साली बुवांची प्रकृती खराब होती. ते खुप आजारी होते. एक दिवस रात्री दोन वाजता उठून पद्मासनात बसले आणि म्हणाले ,"आम्ही आता देवाघरी जातो. त्यांच्याजवळ बसून हळूहळू शुभांगी ताईंनी त्यांना सांगितले "दादा मठाचे बांधकाम व्हायचे आहे. देव त्यांच्या जागेत गेल्यावर बाळ होऊन तुम्ही त्यांना बघायला येणार का? दोन वर्ष थांबा. सोहळा बघा आणि मग वर सर्वांना सांगण्यासाठी जा" खुणेने ते हो म्हणाले. रात्रभर ताई बसून राहिल्या. मधुबुवा जेव्हा आजारी असत तेव्हा शंकर महाराजांचे भक्त मठात येत. चहा पिऊन भेटून गेले की हळूहळू बुवा बरे होत.असे अनुभव अनेक वेळा आले आहेत. शंकर महाराजांनी मधु बुवांना जवळ बोलावून अमृतदिक्षा दिली होती आणि सांगितले होते, "हे अमृत सर्वांना वाट" त्यावर विस्मयचकित होऊन मधु बुवा म्हणाले होते, "वाटतो पण देऊ काय?" त्यावर महाराज म्हणाले ,"तुला जे वाटते ते दे" त्यामूळे आयुष्यभर बुवा मठात व परिसरात भेटणार्या भक्तांना महाराजांनी दिलेल्या दिक्षेतुन ठेवा वाटण्यासाठी आतूर असत. एखादा भक्त भेटला की डोळे आनंदाश्रुंनी भरलेल्या स्थितीत बुवा महाराजांचा आदेश सांगून त्याला साजेशी यथायोग्य मंत्र उपासना देत. मंत्र वाटण्यातला बुवांचा आनंद ओसंडून वाहत असे.

पुन्हा १९९८ साली बुवांची प्रकृती बिघडली. त्यांना ताप आला होता. दत्ताकाका मोहोळकरांना समजावून सांगितले होते, देवांची पूजा सोडू नका. बुवा स्वत: खाली गेले. तिथे एका मुसलमानाचे औषधाचे दुकान होते. तिथे गेले व त्यांना सांगितले "अब मैं उपर जा रहा हूं !" त्या दुकानदाराला वाटले की बुवा पायरया चढून वर जाणार असतील. त्याला काही अर्थ कळला नाही. राजू सोरेगावकर रोज येत होता. दत्ताकाका मोहोळकर, अनंत रत्नपारखी या सर्वांना सांगितले होते की "ब्रह्मदेवाने पाठीवरुन हात फिरवीला रे. माझ्या देवांना सांभाळा" शुभांगी बुवा तेव्हा पुण्याला गेल्या होत्या. त्यांना बुवा नेहमी राणी सरकार म्हणायचे‌. त्यांना पण सांगून ठेवले होते उद्या राणी सरकार येणार आहे. जणू काय शुभांगी ताईंची वाटच बघत होते. सर्वांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. दिवसभर सांगत होते, "माझे हात बांधून नका. हे पाहा रथ आलाय दारात. आता आरती घेऊन ओवाळा" त्यानंतर दुपारी शुभांगीताई आल्या. येताना पुण्यातील शंकर महाराजांच्या समाधीवरील एक हार घेऊन आल्या. सफरचंदाचा रस घेऊन दवाखान्यात गेल्या. राणी सरकार आली आहे हे बुवांना कळले. ताईंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. विश्वास दिला, त्यांना चार चमचे ज्युस पाजला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.मधु बुवा रथातील देवांशी एकरुप झाले. हा दिवस होता श्रावण दुर्गाष्टमीचा. पुण्यात मठात शंकर महाराजांची पालखी उचलली आणि इकडे बुवा शंकरमय झाले. हळूहळू सोलापुरात वाऱ्यासारखी बातमी पसरली. भक्तांच्या झुंडिच्या झुंडी दर्शनास येऊ लागल्या. बुवांचा चेहरा तेजपुंज दिसत होता. कोल्हापुरहुन काटकरसाहेब व त्यांचे शिष्य, मुंबईहून अनिलकुमार खडके आणि शुभराज महाराज, अरविंद कुलकर्णी इत्यादी मंडळी आली. बुवांची आरती करण्यात आली आणि पंचतत्वात विलीन करण्यासाठी त्यांना रथात बसविण्यात आले. तेव्हा काटकर साहेब म्हणाले, "शूर बघावा रणी आणि संत बघावा मरणी."
अशा या शंकर बाबांच्या लाडक्या आणि शंकर शिष्यांमध्ये सर्वांचे परमप्रिय असलेल्या प. पू. श्रीमधुबुवांचे चरणी  साष्टांग नमन .

(भक्तांकडून  साभार )