पुण्यनगरीतील श्री जुन्नरकर दत्तमंदिर

अनसूया माता आणि अत्रि मुनिंसहित भगवान श्री दत्तात्रेय !
अनसूया माता आणि अत्रि मुनिंसहित भगवान श्री दत्तात्रेय

महात्मा फुले मंडई आणि अवतीभवतीच्या परिसरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आणि स्वामी समर्थ मठ या दोन ठिकाणी दत्तभक्त हमखास दर्शन घेतात. पण त्याच भागात छोतसे पण अत्यंत जुने व शांत व प्रासादिक असे  दत्त मंदिर आहे. आवर्जून दर्शनाचा योग जूळवुन आणावा. आपणास प्रासादिक अनुभूती आल्याशिवाय  राहणार नाही. 

हे दत्त मंदिर म्हणजे लक्ष्मी रोडवरील जुन्नरकर दत्तमंदिर. अगदी मुख्य गजबजलेल्या लक्ष्मीरोडवर असंख्य दुकानांच्या गर्दीत लपलेली ही अगदी छोटेखानी परंतु प्रसन्न दत्तमंदिराची वास्तु. त्या परिसरात असलेल्या मोठ्या मोठ्या दुकानांच्या मोठाल्या पाट्यांमध्ये या मंदिराची छोटीशी पाटी आपल्याला पटकन दिसूनही येणार नाही. 

एका लहानशा बोळातून आत प्रवेश केल्यावर एक लहानसा हॉल आणि त्याला लागून मंदिराचा गाभारा दिसून येतो. गाभाऱ्याला जाळीचा बंद दरवाजा असल्याने जाळीतूनच दर्शन घ्यावे लागते सकाळी महाराजांचे पूजेनंतर हा जाळीचा दरवाजा बंद करतात . पितळी कमानीखाली दत्त महाराजांची संगमरवरी सुबक, प्रसन्न, सुहास्यवदन मूर्ती. मूर्तीचे डोळे अतिशय चित्तवेधक व भक्तांना आश्वासक आहेत.  भक्तांची नजर तर महाराजांच्या डोळ्यांवरच खिळून राहते. तीन शिरे सहा हात असलेली ही दत्त महाराजांची मूर्ती. मूर्तीच्या खालच्या दोन हातांमध्ये जपमाळ आणि एक कमंडलू, मधल्या दोन हातांमध्ये डमरु आणि त्रिशूल आणि वरच्या दोन्ही हातांमध्ये शंख आणि चक्र आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूला महाराजांच्या माता अनसूया आणि पिता अत्रिमूनी यांच्याही सुबक मूर्ती देखील आहेत. 

मंदिरावरील पाटीवर सदर मंदिर हे खाजगी मंदिर असल्याचा तसेच या मंदिराची स्थापना वैशाख वद्य १, इ. स. १७६४ मध्ये झाल्याचा उल्लेख आहे. यावरुनच हे मंदिर किती पुरातन आहे याची कल्पना येते. मंदिराच्या गाभाऱ्याच्या पाठच्या बाजूला एक पडका, भग्नावस्थेतील वाडा दिसतो. तसेच, डाव्या बाजूला औदुंबर वृक्षाचं खोड दिसलं. बहुधा इमारत बांधकामाच्या वेळी हा वृक्ष छाटण्यात आला असावा. या पुरातन मंदिराबद्दल अधिक जाणून घ्यायच्या उद्देशाने  श्री  जुन्नरकर यांचेशी  संपर्क झाला असता ते म्हणाले,

"बाहेरची रहदारी, गजबजाट या कशा कशाचीही जाणिव या मंदिरात महाराजांसमोर बसल्यावर रहात नाही. आत इतकी कमालीची शांतता आणि शीतलता जाणवली. लक्ष्मी रोड परिसरात गेलात तर आडवाटेवरच्या या जुन्नरकर दत्त मंदिराला अवश्य भेट द्या. "

दत्त मंदिरात पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केलेले साधारण ८० च्या घरातले श्री जुन्नरकर काका  गाभाऱ्यापाशी बसून बोलताना मंदिराच्या इतिहासबाबत म्हणाले. तसे जुन्नरकर काका आणि काकू दोघेही अतिशय बोलके, मोकळे-ढाकळे. महाराजांवरील भक्तीबरोबरचश्रद्धेने अडल्यानडल्या प्रत्येकाला मदत करणं हा त्यांचा स्वभाव विशेष त्यांच्या बोलण्यातून जाणवला. 

श्री दत्त महाराजांच्या पादुका
श्री दत्त महाराजांच्या पादुका

जुन्नरकर दत्त मंदिराविषयी काकांकडून जी माहिती मिळाली ती थक्क करणारी होती. मूळ जुन्नरकर दत्त मंदिराची स्थापना जरी सन १७६४ मध्ये झालेली असली तरी आता जे मंदिर उभं आहे हे सन १९७५ सालात पुन:बांधणी झालेलं मंदिर आहे.  तुळशीबाग, बेलबाग येथील मंदिरांसारखं लाकडी खांब असलेलं मूळचं पुरातन मंदिर होतं. समोर अंगण, चौथरा, गाभारा, प्रदक्षिणा मार्ग असं सगळं छान होतं. अनेक दत्तभक्त मंडळी दर्शनाला येत असत. वाड्याचं मंदिर नव्हे तर मंदिराचा वाडा होता जो जुन्नरकर कुटुंबाचा सामायिक होता. परंतु, चुलत्यांनी वेगळा निर्णय घेऊन वाड्याचा त्यांचा भाग बांधकाम व्यावसायिकाला विकला आणि त्याने मंदिरासकट वाडा पाडून तिथे इमारत उभी केली. १९७५ साली आता आहे त्या स्वरुपातील केवळ ४ भिंतीचं छोटेसं हे मंदिर त्याच बिल्डरने बांधून दिलं. परंतु, महाराजांना हे आवडलं नाही आणि इमारतीचा वास्तुविशारद, बिल्डर सगळे अकस्मात गेले. चुलत्यांचा अंतही वाईट झाला. 

मूळ मंदिर हे जुन्नरकर काकांच्या खापर पणजोबांच्या खापर पणजोबांनी बांधलं होतं. त्यांची समाधी आजही त्यांच्या घराच्या मागच्या बाजूस आहे.  मात्र, श्री दत्त मंदिर बांधण्याची प्रेरणा त्यांना का आणि कशी झाली? काही दृष्टांत किंवा अन्य काही असं घडलं होतं किंवा कसं, मूर्ती कुठून घडवली गेली याबद्दलचा इतिहास काकांना माहित नाही. खाजगी देवस्थान असल्याने याबद्दलची काही नोंद अथवा कागदपत्रे अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. फ़क्त श्री दत्त महाराजांच्या सेवेतील त्यांची ही आठवी पिढी आहे एवढंच ते सांगू शकले. ते स्वत: महाराजांच्या सेवेत बरेच उशीरा रूजू झाले हे सांगताना “सेवेत कुणाला कधी घ्यायचं हे फ़क्त महाराज ठरवू शकतात. आपली वेळ यावी लागते. सगळं त्यांच्या हातात.”  त्यांना स्वत:ला आणि तिथे येणाऱ्या अनेक दत्तभक्तांना आलेल्या प्रचितीबद्दल काका भरभरुन बोलत होते. पण याचा फ़ार गवगवा किंवा प्रसिध्दी करु नये ही इच्छा या जुन्नरकर दांपत्याने व्यक्त केली  . एक गोष्ट जाणवली  हे मंदिर अत्यंत जागृत असून  स्मतृगामी दत्तमहाराज यांचा तेथे अधिवास आहे

श्री जुन्नरकर काकांच्या खापर पणजोबांच्या खापर पणजोबांची समाधी. यांनीच मूळ दत्त मंदिराचे निर्माण केले होते
श्री जुन्नरकर काकांच्या खापर पणजोबांच्या खापर पणजोबांची समाधी. यांनीच मूळ दत्त मंदिराचे निर्माण केले होते.

सृष्टीतील प्रत्येक जीवावर महाराज लक्ष ठेवून आहेत आणि आपल्या भक्तांवर तर महाराजांचं विशेष लक्ष असतं. आपल्याकडून किती, काय, कशी, केव्हा सेवा घ्यायची हे तेच ठरवतात. सेवेचं स्वरुप, माध्यम, वास्तु हे सर्व काही कालानुरुप बदलू शकतं. शाश्वत, चिरंतन ते फ़क्त महाराज. स्थान-काळ-वेळ या कशाचेच बंधन नसलेले. परमेश्वर हे निराकार निर्गूण तत्व आहे  पण, आपण रुपातच, आकारातच, डोळ्यांना जे दिसतंय ते पाहून त्यावरच श्रध्दा ठेवणारे आणि त्याची उपासना करणारे सामान्य भक्त. आपल्यासाठी देवळं, मंदिरं, त्या वास्तु आणि तिथल्या अधिष्ठित देवता, त्यांची सगूण उपासना, बाह्य उपचार हे महत्वाचे आहेत. निर्गूणोपासनेची उंची गाठणं आपल्याला शक्य नाही भविष्यात शक्य असेलही पण आता या क्षणाला तरी नाही. आणि म्हणूनच त्या निर्गूणाचे भेटी आलो सगूणासंगे असं म्हणत आपण आपल्या भक्तीमार्गावर मार्गक्रमण करत रहायचं फ़क्त, तेवढंच हातात आपल्या !

गुगल लोकेशन आणि पत्ता 

५९६, लक्ष्मी रोड, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे – ४११०३०

https://goo.gl/maps/h4KTeGM5Rx5HY7sz5

|| श्री गुरुदेव दत्त ||